Saturday, November 1, 2014

पणती जपून ठेवा

दैनिक सकाळ, सप्तरंग पुरवणी - रविवार, 2 नोव्हेंबर 2014
 
सुविख्यात समाजसेवकांनी समर्पित होऊन उभ्या केलेल्या भव्य कामाचं कौतुक असावंच, पण स्वतःच्या संवेदनांच्या कक्षा रुंद करणं हे त्याहून महत्त्वाचं. आपल्याला जे आणि जेवढं शक्‍य आहे, तेवढं प्रत्येक जण अवतीभवती करत गेला तर खूप काही बदलेल. नगरच्या ‘स्नेहालय’ या संस्थेचं काम त्यासाठीच महत्त्वाचं. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी या संस्थेनं जो प्रयोग केला, तो तर वस्तुपाठ आहे, लोकसहभागाचा. समाजाचं काम एकट्या-दुकट्यानं नव्हे, अवघ्या समाजानंच करायला हवं, अशा पद्धतीनं सगळे घटक सोबत आले, तर कामाचं रूप किती बदलू शकतं, याचा हा पुरावा.

एखाद्या घटनेवर तुम्ही काय प्रतिक्रिया देता, त्यावरच अवलंबून असतं तुमचं घडणं आणि बिघडणंही. पडत्या पावसात जर्जर कुष्ठरोग्याला बघून भयव्याकुळ होणारा कोणी बाबा आमटे होतो, तर १९८४ मध्ये मेळघाटात टाकलेलं पहिलं पाऊल डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांना वेगळ्या वळणावर घेऊन जातं. या अशा ‘रम्य’ कथा वाचताना सामान्य माणसाला फारच भारी वगैरे वाटत असतं ! ’डॉ. प्रकाश बाबा आमटे’ पाहिल्यावर कळतं, आपलं आयुष्य किती छटाक आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र भाटे या आमच्या पुणेकर मित्रानं दिली, तेव्हा ती स्वाभाविक वाटली आणि प्रातिनिधिकही. पण, अनेकदा हा प्रकार पापक्षालनाचा असतो. आपलं आयुष्य सामान्य आहे आणि ही सगळी मंडळी थोर आहेत, असं एकदा म्हटलं की क्षुद्र जगण्याचा आपला पर्याय कायमस्वरुपी खुला राहतो ! सामान्य माणसाचं हे राजकारणच.


आमिर खान यानं नगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेची माहिती ‘सत्यमेव जयते’मधून दिली आणि ‘या संस्थेला आर्थिक मदत करावी’, असं आवाहनही केलं. त्याच्या आवाहनाला जगभरातून प्रतिसाद मिळाला. हजारो हात पुढं आले. त्यातून ‘स्नेहालय’मध्ये ‘सत्यमेव जयते’ भवन उभारण्यात आलं.

मग वाटलंच कधी तर, ‘तीर्थक्षेत्र’ आनंदवनाला भेट देऊन भारावून जायचं अथवा ‘पर्यटनस्थळ’ हेमलकसाच्या प्रयोगानं स्तिमित व्हायचं! खरं तर, या लोकांनी जे काही केलं, आणि ज्यामुळं केलं, त्या अथवा तशा प्रकारच्या अनुभवांना आपण दररोज सामोरे जात असतो. फक्त हे आपल्याला करायचं नाही, हे आपलं कामच नाही, असं आपण ठरवलेलं असतं. याचा अर्थ, असा एखादा भव्य प्रकल्पच सर्वांनी हातात घेतला पाहिजे असं नाही. पण, आपापल्या स्तरावर ही करुणा जागी ठेवली आणि कार्यरत झाली, तर जग खरंच किती सुंदर होऊन जाईल!

‘तूने ही सिखाया सच्चाइयों का मतलब...’ अशा उद्‌घोषांसह आमीर एकेक कहाणी सांगू लागतो, तेव्हा त्याला हेच सांगायचं असतं. दोन-चार समाजसेवकांनी समर्पित होऊन केलेल्या कामाचं कौतुक असावंच, आपल्यापैकी प्रत्येकाला, पण आपल्या संवेदनांच्या कक्षा रुंद करणं हे अधिक महत्त्वाचं.
आमीरच्या टीमला त्यांच्या संशोधनात नगरचं स्नेहालय गवसलं. ही गोष्ट तीन- चार वर्षांपूर्वीची. स्नेहालय पाहायला अनेक गट येत असतात. तसा एक गट आला, तो ‘सत्यमेव जयते’च्या स्वाती भटकळ यांचा. त्यांना सामाजिक विकासाची अशी मॉडेल्स हवी होती, जी अन्यत्रही उभी राहू शकतात. सामान्य माणूसही आपल्या क्षमता वापरून आपापल्या स्तरावर अशी कामं करू शकतो. सामाजिक काम उभं करायचं म्हणजे प्रचंड पायाभूत सुविधा अथवा पैसा लागतो, हे प्रत्येक वेळी खरं नाही. इच्छा असली की वाटा दिसू लागतात. आमीरची टीम प्रभावित झाली, त्याचं कारण हेच. इथं असे काही तरुण आहेत की जे नोकरी वेगळ्या ठिकाणी करतात, पण एखादं सामाजिक काम बांधीलकी म्हणून करतात.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी या संस्थेनं जे काम उभं केलंय, तो तर वस्तुपाठ आहे, लोकसहभागाचा. समाजाचं काम अवघ्या समाजानं करायला हवं, अशा पद्धतीनं सगळे घटक सोबत आले, तर कामाचं रूप किती बदलू शकतं, याचा हा पुरावा. स्नेहांकुर हा एक प्रकल्प. दत्तक विधान केंद्र असं त्याला म्हणणं फारच संकुचित ठरेल. त्यातून होणारा स्त्री सक्षमीकरणाचा व्यापक प्रयत्नही खूप महत्त्वाचा. नगर जिल्ह्यातील अंतर्विरोध असा होता की जिल्ह्याचा जो भाग प्रगत आणि शहरी आहे, तिथं मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण खूपच कमी. याउलट अकोल्यासारख्या दुर्गम, आदिवासी तालुक्‍यात चित्र चांगलं. स्त्री भ्रूणहत्या हे प्रमुख कारण. राज्यात बहुतेक ठिकाणी स्थिती अशीच आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा नेत्या चित्रलेखा पाटील मागे एकदा म्हणाल्या होत्या, परिसर जेवढा दुर्गम, आदिवासी तेवढ्या महिला अधिक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर. चित्रलेखा नाशिकच्या. लग्नानंतर त्या अलिबागला आल्या. इथली संस्कृती त्यांना महानगरांपेक्षा अधिक मुक्त आणि उदार वाटली. आदिवासी जीवनप्रणालीत स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान. याउलट महानगरी अथवा शहरी वातावरणात मात्र दुय्यम. मुलगाच हवा असा आग्रह टोकाचा. शिवाय, डॉक्‍टर आणि वैद्यकीय सुविधाही मुबलक. त्यामुळं स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण शहरी भागांत जास्त. बहुविधता असलेल्या नगरमध्ये असंच काहीसं दिसलं. मग स्नेहालयच्या टीमनं एक शक्कल लढवली. त्यांनी आरोग्यसेविका, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या, परिचारिका यांची टीम बांधली. सरकारी यंत्रणेलाही सोबत घेतलं. डॉक्‍टरांशी संवाद साधला. स्त्री भ्रूणहत्या रोखणाऱ्यांना जीवरक्षक पुरस्कार दिला जाऊ लागला. एक प्रयोग तर आणखी विलक्षण. तुम्हाला मुलगी नकोय ना? किंवा हे अपत्य अडचणीचं आहे ना? तर हरकत नाही. पण त्याची हत्या करू नका. त्यातून आईच्या जिवालाही धोका. बाळाला जन्म द्या. पुढचं सगळं आम्ही करू, अशी हमी या आई-वडिलांना दिली गेली. अशी मुलं कायदेशीर मार्गानं घ्यायची, त्यांचं संगोपन करायचं आणि कौटुंबिक पुनर्वसनही. अशा साडेतीनशे बालकांचं पुनर्वसन केलं संस्थेनं. त्यात मुली सत्तर टक्के. आदर्श गावाची निवड करताना स्त्री-पुरुष प्रमाण हा एक निकष असावा, असाही आग्रह धरला. या प्रयत्नांनी एक झालं. दर हजारी ८१० असणारं मुलींचं प्रमाण ८९० वर गेलं. येत्या दोन वर्षांत स्त्री-पुरुषांचं प्रमाण समसमान होईल, असा प्रयत्न आहे. हे काम फारच महत्त्वाचं. कारण, विकास आणि प्रगती अशा शब्दांची क्रेझ वाढत असताना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं केलेली ताजी पाहणी चिंताजनक निष्कर्षांना अधोरेखित करणारी आहे. भारतातील आर्थिक वाढीचा दर बरा असेलही, पण आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यात स्त्रियांच्या वाट्याला विषमताच येत आहे. लिंगभाव असमानता निर्देशांकात १४२ देशांच्या यादीत भारत ११४ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी हा क्रमांक १३६ देशांच्या यादीत १०१ वा होता. याला प्रगती मानायचं की अधोगती?

लक्ष्मीकांत देशमुख हे निवृत्त आयएएस अधिकारी आणि प्रसिद्ध साहित्यिकही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी एक मॉडेल विकसित केलं होतं. ‘सेव्ह द बेबी गर्ल’ हे त्याचं नाव. सगळ्या सोनोग्राफी केंद्रांना ऑनलाइन जोडून आणि ॲक्‍टिव्ह ट्रॅकर बसवून खास यंत्रणा त्यांनी निर्माण केली. ‘सत्यमेव जयते’चा पहिला, स्त्री भ्रूणहत्येवरील भाग प्रदर्शित झाला, तेव्हा राजस्थानातील विदारक चित्र समोर आलं. राजस्थान सरकार त्यामुळं खडबडून जागं झालं. त्यांनी देशमुखांशी संपर्क साधला आणि तिथंही ॲक्‍टिव्ह ट्रॅकर्स बसवण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा राजस्थानला मोठ्या प्रमाणात झाला. आजही या देशात निर्भयांच्या वाट्याला जे येतं, त्यावरून ही वाट खडतर आहे, हेच स्पष्ट होतं. हरियानाच्या नव्या आणि एकमेव महिला मंत्री कविता जैन यांची आई जेव्हा म्हणते, ‘‘माझी मुलगी मंत्री झाली हे खरं, पण नवऱ्याच्या पायातील वहाणेच्या जागीच तिचं स्थान आहे, असे संस्कार आम्ही तिच्यावर केले आहेत’’ तेव्हा तर ही लढाई किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. लक्ष्मीकांत देशमुख म्हणतात त्याप्रमाणं, ॲक्‍टिव्ह ट्रॅकर हे तंत्रज्ञानानं दिलेलं एक प्रभावी साधन आहे. मात्र, आधी प्रस्थापित धारणा आणि संस्कार यांची फेरमांडणी करावी लागणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाशिवाय हे काम अशक्‍य आहे. नगरमध्ये तेच झालं. जे केलं ते लोकांनी. अगदी साध्या- साध्या माणसांनी. संस्था ओळखली जाते गिरीश कुलकर्णी यांच्या नावानं, पण कागदावर ते कुठंच नाहीत. साधे पदाधिकारीही नाहीत. ही फौज सगळं करत आहे आणि आम्ही सोबत आहोत, असा त्यांचा दृष्टिकोन. त्यातूनच अजय वाबळे, दीपक काळेसारखे कार्यकर्ते पुढं आले आणि त्यानं गावागावात कला मंचाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचं अभियान बुलंद केलं. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी या अभियानाला लोकांच्या चळवळीचं स्वरूप दिलं. बाळासाहेब वारुळे, रोहित परदेशी, नाना बारसे, संतोष धर्माधिकारी, राहुल जाधव, सारिका माकुडे, अनिल गावडे, हनिफ शेख, प्रवीण मुत्याल, अंबादास चव्हाण, कुंदन पठारे, शिल्पा केदारी अशी फौज उभी राहिली आणि हे काम सर्वदूर पोहोचलं.
आमीरला हे भावलं. ‘सत्यमेव जयते’चा वर्धापन दिन स्नेहालयनं साजरा केला, तेव्हा आमीरनं हे जाहीरपणे सांगितलं. ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग प्रदर्शित होत असताना, २०१२ मध्ये १५ ऑगस्टला आमीरनं नगरच्या या संस्थेची माहिती दिली. आणि, आर्थिक मदतीचं आवाहनही केलं. त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला. हजारो हात पुढं आले. त्यातून ‘स्नेहालय ध्ये’ सत्यमेव जयते भवन उभारण्यात आलं. गेल्या वर्षी २६ जानेवारीला आमीरच्याच हस्ते त्याचं उद्‌घाटन झालं. स्नेहालय’ परिवारानं गेल्या वर्षी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ‘सत्यमेव जयते’चा पहिला वर्धापन दिन साजरा केला. आमीरसोबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘प्रेरणा’ संस्थेचे प्रीती आणि डॉ. प्रवीण पाटकर, तसेच स्वाती आणि सत्यजित भटकळ आदी त्या प्रसंगी उपस्थित होते. गिरीश आणि या टीमची विचार करण्याची पद्धत पाहा. या निमित्तानं त्यांनी एक कार्यशाळा घेतली. काय विषय होता या कार्यशाळेचा? दुष्काळ, त्सुनामी, भूकंप वा अन्य नैसर्गिक आपत्तींना आणखी एक पदर आहे. या आपत्तींच्या वेळी विस्थापित- आपद्‌ग्रस्त महिला आणि लहान मुलांची अनैतिक व्यवसायांसाठी तस्करी होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्या विषयावर चर्चा व्हावी, यासाठी ‘दुष्काळाची दाहकता, विस्थापन आणि मानवी तस्करी’ या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा स्नेहालयनं आयोजित केली होती. ‘सत्यमेव जयते’चा वर्धापन दिन यापेक्षा आणखी वेगळा कसा साजरा होऊ शकतो? आमीर त्या कार्यक्रमात म्हणाला ते खरंय, ‘‘देश बदलेल तेव्हा बदलेल, आधी स्वतःला बदला. हेच उद्दिष्ट्य आहे या कार्यक्रमाचं. कोणा एकाचं काम नाही हे. तुझं, माझं, प्रत्येकाचं हे काम आहे, या निष्ठेनं, सजग नागरिक म्हणून केलं तर देश बदलायला फार वेळ नाही लागत.’’

स्नेहालय हा प्रकल्पच मुळी अशा एका साध्या तरुणाच्या प्रतिक्रियेतून जन्माला आला. एकोणीस वर्षांचा एक तरुण वेश्‍यावस्तीतील आपल्या मित्राकडं जातो आणि तिथलं वास्तव बघून निराश होतो. ही निराशाच त्याला काम करायला भाग पाडते आणि स्नेहालय नावाचं जग आकार घेतं. ज्या टीमनं हे काम उभं केलं, त्यांचं कौतुक आमीरनं पहिल्याच भागात केलं होतं. पण, मुळात हे प्रश्न ज्या संवेदनशून्यतेतून निर्माण होतात, त्यावर इलाज करायला हवा, हे त्याचं सांगणं होतं!
गिरीश कुलकर्णी हे राज्यशात्राचे प्राध्यापक. डॉक्‍टरेटही राज्यशास्त्रातलीच. त्यापूर्वी पत्रकार म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. पण अभ्यास करणं वा विचार करणं यासोबत कृतीवर त्यांचा विश्वास. काम सुरू झालं, तेव्हा एकच विषय लक्षात आला होता.

पण, त्याच्याशी संबंधित खूप मुद्दे आहेत, हे जाणवत गेलं आणि कामाचा परिघ उत्तरोत्तर वाढत गेला. माणसं सोबत येत गेली आणि हे कुटुंब उत्तरोत्तर मोठं होत गेलं. सुवालाल शिंगवी तथा बापूजी, मिलिंद एकनाथ कुलकर्णी, राजीव गुजर, संजय गुगळे, जयप्रकाश संचेती, गिरीश खुदानपूर, डॉ. स्वाती आणि डॉ. सुहास घुले, डॉ. प्रीती देशपांडे, संजय बंदिष्टी, राजेंद्र शुक्रे, सुमन त्रिभुवन, जया जोगदंड, संगीता शेलार, यशवंत कुरापट्टी, वैजनाथ लोहार, नवनाथ लोखंडे, दीपक बूरम, मंजिरी मंगेश कुटे ही टीम आता हे काम सांभाळत असते.
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयानं वीस बड्या आरोपींना जन्मठेप ठोठावली. कारण होतं, या प्रकरणाचा स्नेहालयनं केलेला पाठपुरावा. स्नेहालय उभं राहिलं ते वेश्‍यावस्तीतील मुला-मुलींना उभं करण्यासाठी. कारण, आई वेश्‍याव्यवसाय करते म्हणून मुलींचं आयुष्य त्याच प्रकारे बरबाद होण्याची शक्‍यता. मुलांना मिळणारे पर्याय तेवढेच भयानक. या कोवळ्या पोरा-पोरींना शिकण्याचा, आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून गिरीश आणि त्यांच्या युवा टीमनं हा प्रकल्प सुरू केला. वेश्‍यांच्या मुलांसाठी संस्कारवर्ग, रात्रसेवा केंद्र सुरू केलं. मात्र, मुलं मोठी झाली की पुन्हा व्यसनाच्या गर्तेत आणि मुली वेश्‍या व्यवसायात अडकतात असं लक्षात आलं. त्यातून घडलेल्या एका घटनेनं स्नेहालय उभी राहण्याची सक्तीच केली गेली. एके दिवशी मध्यरात्री दीड वाजता वेश्‍या वस्तीतील काही महिला स्नेहालयच्या कार्यालयात आल्या. सागर नावाच्या मुलाला त्या घेऊन आल्या होत्या. याला तुमच्याकडंच ठेवून घ्या, असा त्यांचा आग्रह. एका वेश्‍येला झालेला तो मुलगा होता. ती दारू पिऊन संतापात त्याला मारहाण करत असे. रागाच्या भरात तिनं त्याच्या डोक्‍यात दगड घातल्यानं इतर स्त्रिया त्याला स्नेहालयमध्ये घेऊन आल्या होत्या. तेव्हा कच खाल्ली असती, तर काहीच घडलं नसतं. मात्र, गिरीशनं त्याला स्वतःच्या घरात ठेऊन घेतलं, त्याचं संगोपन केलं. त्यातून पुढं एक मोठं पुनर्वसन केंद्र उभं राहिलं. १९९२ मध्ये ललिता नावाची वेश्‍या आजारी पडली. तिला एड्‌स झाल्याचं समजताच तिच्या मालकिणीनं घराबाहेर काढलं. ललिताची काळजी तर स्नेहालयनं घेतलीच, पण एड्‌सग्रस्तांची काळजी घेणारं पहिलं निवासी केंद्रही त्यातून सुरू झालं. एचआयव्ही बाधित मुलांसाठीचे केंद्र, त्याला जोडून सुसज्ज रुग्णालय, स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र असा प्रकल्प उभा राहिला. केवळ लोकाश्रय आणि लोकसहभाग या बळावर स्नेहालयचे एकूण १७ सेवा प्रकल्प सुरू आहेत. स्नेहालय मित्रमंडळ राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या कामाचा उत्तरोत्तर विस्तार होतो आहे. त्यासाठी देणारे हात वाढतच आहेत.

वेश्‍यांविषयी कोणी बोलत नव्हतं किंवा अशा भलत्या-सलत्या विषयावर काम करणंच गैर मानलं जात होतं, अशा काळात ही चळवळ सुरू झाली. आता तुलनेनं आपण पुढं आलो आहोत. देहविक्री व्यवसायाला वैध दर्जा द्यावा, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी नुकतंच म्हटलंय. कारण हा व्यवसाय अवैध ठरवल्यानं वेश्‍यांचं शोषण मोठ्या प्रमाणात होतं. तस्करी वाढते. भारतात सुमारे १२ लाख अल्पवयीन मुली वेश्‍या व्यवसायात आहेत. जर्मनी आणि हॉलंड यासारख्या देशांनी हा व्यवसाय कायदेशीर केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम पुढे आले. स्नेहालयनं केलेल्या कामाचा एक फायदा असा दिसतो की नगर जिल्ह्यात एकही अल्पवयीन मुलगी या व्यवसायात नाही, असं सुवालाल शिंगवी सांगतात. अनाथ, अनौरस, बेवारस बालके आणि कुमारी मातांचे संरक्षण- संगोपन करण्यासाठी सुरू झालेला स्नेहांकुरसारखा प्रकल्प आता इतर जिल्ह्यांतही सुरू होतो आहे. स्नेहालयच्या दाराशी अथवा गावातील कचरा कुंडीत टाकलेली बालके पूर्वी दिसत. आता ते प्रमाण कमी झालंय, असंही ते सांगतात. शाळाबाह्य मुलांसाठी उपयुक्त ठरलेला बालभवन हा प्रकल्प असाच महत्त्वाचा. झोपटपट्ट्या हे नागरी प्रश्नांचं मूळ असेल, तर तिथल्या मुला-मुलींना योग्य वातावरण द्यायला हवं. म्हणून हा प्रकल्प सुरू झाला. आज संस्थेची स्वतःची इंग्रजी माध्यमाची सुसज्ज अशी शाळा आहे. तिथं ही धडपडणारी पोरं विनामूल्य आणि दर्जेदार शिक्षण घेत असतात. स्नेहाधार हेल्पलाइन (क्रमांक - ९०११३६३६००) या सेवेचं उद्‌घाटन आमीरच्याच हस्ते झालं होतं. कौटुंबिक अत्याचार ते सामूहिक बलात्कारापर्यंत कोणतीही समस्या असो, इथं मदत मिळते. हे काम एकट्याचं नाही, ते सामूहिक आहे. मुख्य म्हणजे तरुणांचं आहे. म्हणून सतत तरुणांशी संवाद केला जातो. ‘युवा निर्माण’ प्रकल्पात तरुणांना संकल्प दिला जातो आणि मग तेही या परिवर्तनाचा भाग होतात, असं शिंगवी कौतुकानं सांगतात.

अगदी परवाची गोष्ट. स्नेहालयच्या माजी विद्यार्थ्यांचा दिवाळी मेळावा झाला, नगरमध्ये. दोनेकशे मुलं-मुली त्यासाठी आली होती. संस्थेतनं बाहेर पडून, स्वतःच्या पायावर उभे राहिलेले हे माजी विद्यार्थी बोलत असताना ऐकणं हाच एक अनुभव होता. कोणाला अल्पवयात देहविक्रयात वापरलं गेलं आणि स्नेहालयनं मुक्त केलं. कोणाची आई देहविक्रय करणारी, कित्येकांना आई-वडिलांचा पत्ता नाही... अशा वेगवेगळ्या कहाण्या प्रत्येकाच्या. पण त्यापैकी प्रत्येकजण आज दिमाखात आयुष्याला भिडतो आहे. शिवाय, जमेल त्या पद्धतीनं स्नेहालयच्या आणि इतर सामाजिक कामातही सहभागी होतो आहे. अशी अनेक साधी माणसं आज स्नेहालयचं सारथ्य करत आहेत.
सूर्य- ताऱ्याची आरती करण्यात गैर काही नाहीच, पण माझ्या अवतीभवतीचा परिसर माझ्यापरीनं मीही उजळून टाकू शकतो, अशी प्रत्येकाला होत जाणारी जाणीव हे स्नेहालयचं खरं यश आहे!

 संजय आवटे sunjaysawate@gmail.com पणती जपून ठेवा..

No comments:

Post a Comment