Monday, October 27, 2014

‘स्नेहालय’मध्ये दिवाळी आनंदोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नगर
Maharashtra Times (Ahmednagar Edition) Oct 27, 2014, 09.40AM IST 
रांगोळ्यांनी सजलेला स्नेहालय संस्थेचा परिसर... कार्टुन, जंपिंग डान्स, झोके, घोडेस्वारी, उंटस्वारी करण्यात मग्न असणारी मुले... संगीताच्या तालावर मुलांसोबत थिरकणारे उपस्थित मान्यवर... दीपोत्सवाने उजळलेला परिसर... आकाशात सोडले जाणारे आकाशदिवे.... अशा उत्साहपूर्ण वातावरणात स्नेहालय संस्थेत दिवाळी आनंदोत्सव साजरा झाला. लायन्स क्लब मिटडाऊनच्या पुढाकाराने झालेल्या या दीपोत्सवात मान्यवरांनी सहभाग घेऊन मुलांसमवेत मजा केली.

शहरातील 'स्नेहज्योत', 'हिंमतग्राम', 'बालभवन', 'चाइल्ड लाइन', 'स्नेहालय', 'यतिमखाना', स्नेहबंध, बालसुधारगृह अशा विविध सामाजिक संस्थांतील गरीब, अनाथ, अंध मुले व मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता शनिवारी एका वेगळ्या दिवाळीचे लायन्स क्लबच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 'स्नेहालय'मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी गिरीश मालपाणी, डॉ. किरण दीपक, धनंजय भंडारे, महेश पाटील, कडूभाऊ काळे, अरविंद पारगावकर, किरण भंडारी, सुवालाल शिंगवी, सुनील छाजेड, जगदीश मुथ्था, सुमित लोढा, प्रिया बोरा, हरजितसिंग वधवा, डॉ. सिमरन वधवा आदी उपस्थित होते.

सामुहिक भाऊबीज उपक्रमातून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रसिद्ध गायक प्रशांत नसेरी व मुंबई आकाशवाणीचे निवेदक अभय गोखले यांनी सादर केलेल्या विविध लोकप्रिय गाण्यांच्या तालावर उपस्थित मुला-मुलींचा नृत्याविष्कार रंगला. काही लायन्स क्लब सदस्यांनीही ठेका धरला. दीपोत्सवामध्ये मुलांसाठी फन फेअर, जपिंग डान्स, घोडागाडी आदी खेळांसोबतच चॉकलेट, पॉपकॉर्न, बुढ्ढी के बाल अशा विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी होती. कार्यक्रमामध्ये अकराशे विद्यार्थी व ५० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी मुलांना दिवाळी भेट म्हणून मिठाई, फराळ व शाळेची बॅग देण्यात आली.


'स्नेहालय'मध्ये दिवाळी आनंदोत्सव 

No comments:

Post a Comment